होळीचा उद्देश म्हणजे वाईट विचार 

आणि 

वाईट गोष्टीचा त्याग करणे होय 

होळीचा उद्देश म्हणजे वाईट विचार आणि वाईट गोष्टीचा त्याग करणे होय

होलिका ही वाईट प्रवृत्तीची होती त्यामुळे तिचा अंत सुद्धा वाईट पद्धतीनेच झाला. त्यामुळेच मनुष्याने वाईट आचार-विचारांना बाजूला सारणे आणि मनातील वाईट विचार होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करणे, हाच होळी साजरा करणे यामागचा उद्देश आहे. याच दिवशी वाईट विचारांचा व वाईट गोष्टींचा त्याग केला करून एक प्रकारे मनुष्याने जीवनाला नवीन वळण लावायला पाहिजे. 


भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते. त्यानंतर रामनवमी, अक्षय्य तृतीया, गणपती, दुर्गा उत्सव-नवरात्र (दसरा), दिवाळी (वसुबारस, पाडवा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज) अशा सणांची मांदियाळी असते आणि शेवटचा सण म्हणजे होळीचा असतो. फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी सण साजरा करत असतो. त्यालाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. यालाच होळीचा, उत्सव, 'होलिकोत्सव' म्हणतात. महाराष्ट्रामध्ये होळीला 'शिमगा' असे सुद्धा  म्हणतात. तसेच होरी हा शब्द सुद्धा प्रचलित आहे.


वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. वातावरणात नैसर्गिक बदल झालेला असतो. थंडी संपून, ऊन तापायला सुरुवात झाली असते. उन्हाळ्याची चाहुल लागते. पानगळ सुरू झाली असते. उत्तर हिंदुस्थान, दक्षिण हिंदुस्थान, महाराष्ट्रात होळीचा सण हा वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात.


कोकणात होळीचा उत्सव मोठा प्रमाणात असतो. विशेष रत्नागिरी जिल्ह्यात फार चांगल्या रीतीने साजरा करतात. त्या भागामध्ये शिमगा असे सुद्धा म्हणतात. कोकणात हा सण ५ ते १५ दिवस साजरा करून होळीचा हा मुख्य दिवस असतो. गावातील ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावण्याचा मान असतो व त्या होमातील निखारा घेऊन मग गावामध्ये ठिकठिकाणी होळी पेटवली जाते. 


होळी पौर्णिमा, धुळवड, आणि होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी असा हा सण साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण समजला जातो. तसेच पुरुष आणि स्त्रिया एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. तसेच पारंपरिक नृत्य, पारंपरिक गाणी गाउन साजरी केली जातात. वंजारी समाजात होळीला फार महत्त्व आहे. पारंपरिक पोषाख घालून नृत्य करण्याची प्रथा प्रचलित आहे.


मध्य प्रदेशात इंदूर, उत्तर प्रदेशात मथुरा, वृंदावन नंदगावला होळी या सणाचे विशेष महत्व असून मोठ्या उत्साहात साजरा होते. परंतु प्रत्येक ठिकाणचे महत्व आणि आख्यायिका वेगवेगळ्या सांगितल्या जातात.


पूर्वी गावातील प्रमुख चौकात म्हणजे नगारखान्यात होळी पेटविण्याची प्रथा होती. आताही गावामध्ये आणि शहरामध्ये प्रमुख चौकांच्याबरोबरीने निरनिराळ्या कॉलन्यांतून होळी पेटवली जाते. एका खड्यात एरंडाची उंच फांदी रोवून आजूबाजूला शेणाच्या गोवऱ्या रचतात. लाकूड, झाडाच्या वाळलेल्या फांद्या रचतात आणि होळीला हार घालतात. मुख्य होळी पेटवली की तिथून मशाल पेटवून इतर होळी पेटवितात, अशी प्रथा आहे. 


एकमेकांशी वैर, राग असेल तो होळीच्या दिवशी टाकून संबंध सुधारावेत ही भावना असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन- धुळवड साजरी करतात. तर पाचव्या दिवशी 'रंगपंचमी' साजरी करतात. रंगपंचमीच्या दिवशी सर्वत्र भेदभाव, भांडणे, वैर विसरून रंगांची उधळण करतात. पावरा लोकांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. बंजारी समाजातही होळी उत्साहाने साजरी होते.


रंगांची उधळण करत असताना तो रंग शरीराला अपायकारक नसावा आणि तसेच कोणालाही इच्छेविरुद्ध रंग लावू नये. मद्य प्राशन करू नये. या सर्व गोष्टींचे सामाजिक भान ठेवणे महत्त्वाचे आहे.


होलिका ही वाईट प्रवृत्तीची होती त्यामुळे तिचा अंत सुद्धा वाईट पद्धतीनेच झाला. त्यामुळेच मनुष्याने वाईट आचार-विचारांना बाजूला सारणे आणि मनातील वाईट विचार होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करणे, हाच होळी साजरा करणे यामागचा उद्देश आहे. याच दिवशी वाईट विचारांचा व वाईट गोष्टींचा त्याग केला करून एक प्रकारे मनुष्याने जीवनाला नवीन वळण लावायला पाहिजे.